नागपुर: नागपुरातील गणेशपेठ परिसरात एका सराईत चोरट्याने अक्षरशः चित्रपटातील शैलीत चोरीची धाडसी घटना घडवली आहे. दुकानाचे शटर न तोडता थेट छत फोडून मोबाईल दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता याच चोरट्याने शेजारील बार आणि मेडिकल स्टोअरमध्येही अशाच पद्धतीने चोरी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट परिसरातील ‘मोबाईलवाला’ या दुकानात ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या वरचे छत फोडून आत प्रवेश केला आणि महागडे मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच रोख रक्कम चोरून नेली.
या चोरीमध्ये दोन आयफोन, दोन व्हिवो कंपनीचे मोबाईल, एक सॅमसंग, एक रेडमी मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाला चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
विशेष म्हणजे, आरोपीने याच इमारतीतील शेजारी असलेल्या बार आणि मेडिकल स्टोअरमध्येही छत फोडून प्रवेश केला आणि तेथूनही चोरी केली. एकाच रात्री सलग तीन दुकानांना लक्ष्य केल्याने हा चोरटा पूर्ण तयारीनिशी आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. गणेशपेठ पोलीस विविध पथकांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





