Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आमदारांच्या बंगल्यात चोरी; चोराने बँकेतून उचलले अडीच लाख, दुसऱ्या प्रयत्नात अटक

Advertisement

नागपूर : नागपूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक चोरीच्या प्रकरणाने पोलीस यंत्रणेसोबतच बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या बोरगाव येथील पर्ल हेरिटेज सिटीमधील बंगल्यात दिवसाढवळ्या चोरी करून चोरट्याने रोकड आणि आमदारांच्या स्वाक्षरीचे चेकबुक लंपास केले. त्यानंतर बनावट आधारकार्डाचा वापर करून बँकेतून अडीच लाख रुपये काढण्यात तो यशस्वी झाला. मात्र, आणखी पैसे काढण्याच्या प्रयत्नात पुन्हा बँकेत पोहोचताच पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.

झोन-४च्या डीसीपी रश्मिता राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. बोरगाव परिसरातील पर्ल हेरिटेज सिटी येथील बंगला क्रमांक १५ मध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एक बॅग चोरून नेली. या बॅगेत ७५ हजार रुपयांची रोकड आणि आमदार संजय मेश्राम यांच्या स्वाक्षरीचे चेकबुक ठेवण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ३० वर्षीय तनमय गनवीर याच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवले.

तपासात धक्कादायक बाब समोर आली. चोरीनंतर आरोपी थेट बँकेत गेला. त्याने बनावट आधारकार्डाच्या आधारे स्वतःची ओळख पटवत चोरलेल्या चेकबुकमधील चेकवर तीन लाख रुपयांची रक्कम भरली. बँकेने पुरेशी पडताळणी न करता आरोपीला सुमारे अडीच लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने मास्क परिधान केला असतानाही त्याची ओळख व्यवस्थित पडताळण्यात आली नसल्याने बँकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

डीसीपी रश्मिता राव यांनी सांगितले की, आरोपीला पहिल्याच प्रयत्नात पैसे मिळाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आणखी ५० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुन्हा बँकेत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली.

पोलीस चौकशीत तनमय गनवीर याच्याविरुद्ध यापूर्वीही चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच एमडी या अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे त्याने स्वतःची दुचाकी गहाण ठेवली होती. आर्थिक अडचणीतूनच त्याने ही चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी तो फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी रश्मिता राव यांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.