Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अवैध सावकारीचा प्रकार;3 लाखांच्या कर्जासाठी 15 लाखांची वसुली!

Advertisement

नागपूर : नागपूरच्या सक्करदरा परिसरात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ 3 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल 15 लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करत पीडिताने पोलिसांत धाव घेतली आहे. अतिरिक्त पैशांची मागणी करत गुंडांमार्फत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

फिर्यादी मोहित मिलिंद पारधी यांच्या तक्रारीनुसार, मार्च 2025 मध्ये त्यांनी कमलेश गणपतराव हनोते याच्याकडून 48 लाख रुपयांना भूखंड खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. त्यासाठी 30 लाख रुपयेही अदा करण्यात आले. मात्र भूखंडाची नोंदणी न झाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी त्यांना कथितरित्या अनिता पूरनलाल भारद्वाज हिच्यामार्फत जास्त व्याजाने कर्ज घेण्यास भाग पाडण्यात आले.

सुरुवातीला घेतलेले 1 लाख रुपयांचे कर्ज वेळेत फेडल्यानंतर जुलै 2025 मध्ये त्यांनी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र परतफेडीस उशीर होताच आरोपींकडून सतत धमक्या आणि पैशांसाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या दबावाखाली 3 लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल 15 लाख रुपये वसूल करण्यात आले. एवढ्यानंतरही आणखी पैशांची मागणी सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या मानसिक त्रासाला कंटाळून मोहित पारधी यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकाने त्यांना वेळीच मदत केल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Advertisement

या तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी कमलेश गणपतराव हनोते आणि अनिता पूरनलाल भारद्वाज यांच्याविरोधात अवैध सावकारी, जबरदस्तीने वसुली, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या अवैध सावकारीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.