Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सिग्नलवरचं बालपण वाचलं; नागपुरात मिशन मुक्ती-3 अंतर्गत 22 बालकांसह 28 जणांची सुटका!

Advertisement

नागपूर : शहराला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी नागपूर पोलिस आणि महिला व बाल विकास विभागाने “मिशन मुक्ती-3” ही विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध सिग्नल आणि रस्त्यांवर भीक मागणाऱ्या 22 बालकांसह एकूण 28 जणांची सुटका करण्यात आली. या कारवाईनंतर बालकांच्या पुनर्वसन आणि संरक्षण प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.

धंतोली, सीताबर्डी यांसारख्या वर्दळीच्या भागांत पोलिस आणि महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त पथकाने विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवले. सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले, महिला आणि एक पुरुष यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 22 बालकं, 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

बालकांना बाल न्याय कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिक्षण, निवारा आणि पुनर्वसनासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर प्रौढ व्यक्तींना समुपदेशन करून पोलिस संरक्षणात त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची तयारी सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यांतून लोक नागपुरात येतात आणि उदरनिर्वाहासाठी सिग्नलवर भीक मागणे, पेन-फुले विकणे किंवा वाहनांच्या काचा साफ करण्याच्या माध्यमातून पैसे मागताना दिसतात. यामुळे शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नल ‘हॉटस्पॉट’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले असून पुढील काळातही सातत्याने मोहीम राबवली जाणार आहे.

Advertisement

रेस्क्यू करण्यात आलेल्या काहींनी आपण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव परिसरातील असल्याचे सांगितले. रोजगार नसल्यामुळे नागपुरात येऊन भीक मागत असल्याची कबुली त्यांनी दिली. सध्या सर्वांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले असून भोजन, आरोग्य आणि देखरेखीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, “मिशन मुक्ती-3” अंतर्गत बालकांना भिक्षावृत्तीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित आणि सन्मानाचं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.