नागपूर – करोना व्हायरचा वाढता प्रकोप बघता, महा मेट्रोने त्या दृष्टीने व्यापक पाऊले उचलण्याची सुरवात केली आहे. प्रवाश्यां सोबतच कर्मचाऱ्यांची देखील विशेष काळजी घेतल्या जात आहे. मेट्रो स्टेशन आणि ट्रेन येथे एकीकडे औषधीची फवारणी होत असतानाच, दुसरीकडे तब्बल २,००० मास्कचे कामगार आणि कर्मचाऱ्यांदरम्यान वितरण करण्यात आले आहे.
महा मेट्रो येथे सुरुवातीपासूनच स्वच्छता संदर्भात विविध उपाय योजना केल्या असून करोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून या उपाय योजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी अधिकाऱ्यांन सोबत बैठक घेत स्वच्छता आणि सुरक्षितता संदर्भात दिशा निर्देश दिले. डॉ. दीक्षित यांनी बैठकीमध्ये मेट्रो प्रवाश्यांन सोबतच विविध निर्माणाधीन कार्यस्थळी कामगारांच्या सुरक्षितते संदर्भात उपाय योजना करण्याचे सांगितले. या व्यतिरिक्त डॉ. दीक्षित यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देत केलेल्या परिस्थीतीचा आढावा घेतला.
डॉक्टर पथकांची नेमणूक : दिलेल्या निर्देशानुसार १२ डॉक्टरांचे पथक विविध कार्य स्थळी आणि महा मेट्रोत काम करणाऱ्या कामगारांच्या रहिवासी भागात महा मेट्रोच्या वतीने तैनात केले आहेत. सदर डॉक्टर कर्मचारी आणि कामगारांचाय दरम्यान जागरूकता अभियान राबवीत आहे. या व्यतिरिक्त पॅरा मेडिकल कर्मचारी देखील यास्थळी तैनात करण्यात आले आहेत. तसेच कुठल्याही आपतकालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.
२००० कर्मचाऱ्यांची चाचणी : कामगार आणि कर्मचाऱ्यांचे इंफ्रारेड थर्मोमीटर माध्यमाने चाचणी करण्यात येत आहे. तसेच चाचणी करण्यात आलेल्या कामगारांचे रेकॉर्ड भविष्यातील संदर्भांकरिता सांभाळून ठेवण्यात आले आहे. चाचणी करतांना रोगाच्या कुठल्याही संभाव्य लक्षण तपासण्यासाठी इंफ्रारेड थर्मोमीटरचा वापर करण्यात येत असून विविध कार्य स्थळी ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दिलेल्या निर्देशानुसार व्हायरसचा प्रकोप थांबवण्याकरित्या विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. कार्यालय, कार्य स्थळ आणि कामगार कॉलनी येथे वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार नियमीतपणे साफ-सफाई आणि औषधीची फवारणी करून औषधी आणि सॅनिटायजर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नव्याने रुजू झालेल्या कामगारांची विशेष देखरेख: महा मेट्रोच्या सेवेत नव्याने रुजू झालेल्या कामगारांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. या रोगाचे काही लक्षण या कर्मचाऱ्यांमध्ये दिसतात का याकडे पुढील १४ दिवस विशेष लक्ष देण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांनी दौरा केलेल्या परिसराचा या रोगाशी काही संबंध आहे का याची देखील माहिती घेतली जाते. मेट्रो स्टेशन आणि ट्रेनचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता फवारणी केली जाते.
महा मेट्रो तर्फे सूचनावली: महा मेट्रोने आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकरिता विशेष सूचनावली तयार केली आहे. स्वच्छतेचा स्तर कसा वाढावा याकडे लक्ष देण्या संबंधीचे निर्देह्स दिले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदार रजेवर होते त्यांना आपल्या दौऱ्या संबंधी माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकल्प प्रमुख, जनरल कन्सल्टन्ट यांच्या अंतर्गत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून या संबंधीच्या सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचे जवाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. मेट्रो संवाद आणि इतर सर्व तत्सम कार्यक्रम ३१ मार्च २०२० पर्यंत थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन परिसर येथील टीव्ही स्क्रीन वर जनजागृती करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय आणि स्वास्थ मंत्रालयाने दिलेली माहिती सोशल मिडियावर प्रसारित झाली आहे. या शिवाय महत्वाच्या ठिकाणी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सूचना फलक लावण्यात आले आहे.