
नागपूर : उत्तर भारतीय समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी छठ पूजा साजरी करण्याची तयारी नागपूरमध्ये जोरात सुरू आहे. येत्या 25 आणि 28 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा अक्षरशः बहरल्या आहेत.
अंबाझरी आणि फुटाळा तलाव परिसरात पूजेची तयारी सुरू असून, पूजेचे साहित्य, फळे, नारळ, उस, सूप, टोपल्या, तसेच नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तलावकिनारी जमणार आहेत.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात येत असून, स्वच्छता, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी घेतली गेली आहे. परंतु सध्या शहरात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे छठपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा तुडुंब साठा असलेले बाजार आणि वाढती मागणी.शहरातील हा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरत असून, बाजारपेठांमधील ही गजबज नागपूरच्या बहुविध संस्कृतीचं दर्शन घडवते.








