नागपूर : हिंगणा रोडवरील महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीबाहेर डी गटातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतनातून पीएफ आणि ईएसआयसीची कपात करावी तसेच तीन वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याची पद्धत बंद करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
कंपनीत आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या मागण्यांवर व्यवस्थापनाशी चर्चा सुरू होती. मात्र, ठोस तोडगा न निघाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनामुळे कंपनीबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू आहे.




