
नागपूर: महाराष्ट्र पोलीस रेजिंग सप्ताहाच्या निमित्ताने नागपूर शहरातील कलमना यार्ड परिसरात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. झोन-५ अंतर्गत जप्त करण्यात आलेली सुमारे ३७ लाख रुपयांची अवैध दारू व प्रतिबंधित नायलॉन मांजा विधिवतपणे नष्ट करण्यात आला.
या कार्यक्रमाला संयुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना समाजातील अवैध कृत्यांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोन-५ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल ५२६ गुन्ह्यांमध्ये सुमारे २७ लाख रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली होती. ही संपूर्ण दारू आज कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आली. तसेच ३० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजाही नष्ट करण्यात आला.
या वेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, प्रतिबंधित दारू व नायलॉन मांजा यांचा वापर टाळावा, कारण यामुळे जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता असते. अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी अवैध दारू विक्री व तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या सुमारे ३० गुन्हेगारांना झोन-५ अंतर्गत नागपूर शहर व ग्रामीण भागातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भविष्यातही अशा अवैध कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.








