
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भावनगर येथील आकाश पारेख याचे लग्न जमत नसल्याने त्याच्या एका मित्राने नागपुरात लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आकाश नागपुरात आला. येथे राणी उर्फ कोमल पांडे हिने मेयो रुग्णालयाजवळ त्याची नम्रता मालवीय हिच्याशी भेट घडवून आणली. आकाशने मुलीचे घर आणि कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, त्याला कोराडी परिसरातील एका घरात नेण्यात आले. तेथे मुलगी दाखवून त्याच दिवशी लग्न लावून देण्याचे सांगण्यात आले.
लग्नाच्या विधींसाठी मुलीला पैसे आणि दागिने देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आकाशने एटीएममधून ७० हजार रुपये काढून तसेच सोबत आणलेले सोन्या-चांदीचे दागिने नम्रता हिच्याकडे दिले. त्यानंतर बर्डी येथे लग्नासाठी जात असताना नम्रताचा कथित पती तेथे आला आणि ही माझी पत्नी असल्याचा दावा करत आकाशसोबत वाद घालू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आकाशने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी नम्रता मालवीय हिला अटक केली. मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल पांडे हिचा शोध घेत पंचपावली परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात ही टोळी लग्नाचे आमिष दाखवून गरजू तरुणांचा विश्वास संपादन करत असल्याचे आणि त्यांच्याकडून रोकड व दागिने उकळून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास तहसील पोलीस करत आहेत.




