Published On : Thu, May 23rd, 2019

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे

Advertisement

नागपूर: लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत.

देशाच्या विकासासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला जी पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचा मनापासून आभारी आहे. गेल्या पन्नास वर्षात जे झालं नाही ते मोदींच्या सरकारने करून दाखवलं. येत्या काळात भारत निश्चितच जगातली एक मोठी आर्थिक सत्ता बनेल. यात शेतकरी, मजूर, गरीब वर्ग, वंचित घटक यांचा विचार प्रामुख्याने केला जाईल.

नागपूरच्या जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला त्याकरिताही मी जनतेचा आभारी आहे. लोकशाहीत या कौलाला स्वीकारणे गरजेचे आहे.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घेतल्या आहेत. मात्र आपल्याकडे पद्धत आहे की, जिंकली तर जनतेचा कौल आणि पराभव झाला तर इव्हीएम घोटाळा म्हणायचे. पण जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा. निवडणुका हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मी विरोधी पक्षात काम केलं आहे. ती भूमिका निभवावी लागते. त्यामुळे कुणी संन्यास घेण्याची भाषा करू नये. पुढे सगळ््यांनीच मिळून काम करायचं आहे.

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मतमोजणीबाबत घेतलेल्या आक्षेपाविषयी विचारलेल्या प्रश्नाला, त्यांनी आपल्याला काहीच म्हणायचं नाही असे उत्तर दिले.

यंदा निवडणुकीतील प्रचारात भाषेचा स्तर खाली आल्याकडे लक्ष वेधले तेव्हा त्यांनी, जनता दोन्ही पक्षांचे ऐकून निर्णय देत असते, मात्र गुणात्मक सुधारणेसाठी सर्वांनी पालन करावे. पंतप्रधान चोर आहे, अशा प्रकारची भाषा योग्य नाही.

२०१४ मध्ये नागरिकांत नाराजी होती. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांची निवड केली. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात एक स्थिर सरकार देशाला दिलं आहे. हे सरकार विकासाभिमुख आहे. आम्ही विदर्भातील पाण्याचा मुख्य प्रश्न येत्या काळात हाताळणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मत व्यक्त केले.