विदर्भात गडकरी-मुख्यमंत्र्यांचा कामांना पावती
नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा-शिवसेनाच्या महायुतीला मिळालेली प्रचंड आघाडी पाहता मतदारांनी भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेला हा विश्वास आहे. तसेच विदर्भातील निकालाची आघाडी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांना जनतेने दिलेली ही पावतीच असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर -भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये भाजपाला मिळालेल्या यशापेक्षा मोठे यश यावेळी मिळाले असून यावेळी मोदी लहर नसून मोदी नावाची सुनामी आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्या राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळू नये अशी दारुण परिस्थिती काँग्रेसची मतदारांनी केली आहे. देशाचे नेतृत्व, विकास कामे, देशाची सुरक्षा आणि सबका साथ सबका विकास या मुद्यांवर जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले आहे.
विदर्भ आणि नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींनी आणलेल्या विकासगंगेमुळे विदर्भातील जनतेने भाजपा सेनेसह महायुतीच्या बाजूने विजयाचा कौल दिला आहे. मागील 70 वर्षात झाली नसतील एवढी कामे महाराष्ट्रात आणि विदर्भात या दोन नेत्यांनी फक्त पाच वर्षात करून दाखविली आहेत. ती जनतेसमोर आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणार्या विदर्भातही जनतेने महायुतीलाच स्वीकारले आहे.
नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया या तीनही मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी माझ्यावर होती. या तीनही मतदारसंघात भाजपा व सेनेचे उमेदवार विजयी होत आहेत. केंद्रात भाजपा स्पष्ट बहुमताच्या पुढे तर रालोआला निर्विवाद बहुमत जनतेने दिले असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.