नागपूर : यशोधरानगर परिसरातील भिलगाव-कामठी रोडवरील जेएस लॉजिंग रेस्टॉरंटमध्ये लॉजच्या आड कथित देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकत एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका केली. या प्रकरणात लॉजचा संचालक शिवशंकर पटले याला ताब्यात घेण्यात आले असून, महिलांची व्यवस्था करणारा कथित दलाल बब्बू ऊर्फ कुलजीतसिंग रेन फरार आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाला यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉजमध्ये कथित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर पंचांसह पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कारवाईचे नियोजन केले. बनावट ग्राहकासोबत एका महिलेचा दोन हजार रुपयांत व्यवहार ठरविण्यात आला. महिला खोलीत पोहोचताच पथकाने लॉजवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलीसह तीन महिला आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांना ग्राहक पुरविले जात असल्याचा संशय आहे.
या प्रकरणात शिवशंकर पटले याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर बब्बू ऊर्फ कुलजीतसिंग रेन हा फरार असून, तो लॉजसाठी महिलांची व्यवस्था करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, याच लॉजमध्ये यापूर्वीही कथित देहव्यापाराच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी लॉजचा मालक वेगळा होता. त्यानंतर शिवशंकर पटले याने हे लॉज भाडेतत्त्वावर घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी कथित गैरप्रकार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला.
यशोधरानगर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासह या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.





