
नवी दिल्ली : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR वरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबरच्या संयुक्त निवेदनाचा दाखला देत विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप आणि संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न तथ्यहीन असल्याचा दावा भाजपने पत्रकार परिषदेत केला.
भाजपच्या म्हणण्यानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू व डॉ. विवेक जोशी यांच्या बैठकीनंतर आयोगाने स्पष्ट केले की SIR संदर्भातील सर्व निर्णय तीनही आयुक्तांच्या एकमताने घेण्यात आले आहेत. २४ जून २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या SIR आदेशालाही संपूर्ण आयोगाची मंजुरी असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पाठविलेल्या पत्रावरूनही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, हे पत्र कोणत्याही धोरणात्मक विषयाशी किंवा SIR प्रक्रियेशी संबंधित नसून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याच्या प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, SIR च्या कायदेशीरतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने २७ मे २०२६ रोजी निवडणूक आयोगाला अशी प्रक्रिया राबविण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. न्यायालयाने SIR ला घटनात्मकदृष्ट्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या उद्देशाशी सुसंगत असल्याचे नमूद केले होते.
भाजपने याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांवर केलेले आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी केली. EVM, निवडणूक प्रक्रिया आणि इतर घटनात्मक संस्थांबाबत राहुल गांधी व विरोधकांकडून यापूर्वी करण्यात आलेल्या आरोपांचाही भाजपने पत्रकार परिषदेत उल्लेख केला.




