नागपूर : कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विटाभट्टीवर क्षुल्लक वादाचे भीषण रूप धारण करत एका मजुराचा जीव गेला. विटा भरण्याच्या कामावरून झालेल्या वादात संतापलेल्या सहकारी मजुराने फावड्याने डोक्यात वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कलमना पोलिसांनी आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनील सतनामी (वय 40) आणि आरोपी हिमांशू उर्फ गुड्डू सोनटक्के (वय 28) हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे असून कलमना परिसरातील बबलू खान यांच्या विटाभट्टीवर मजुरीचे काम करत होते.
12 जुलै रोजी विटा भरण्याच्या कामादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. काही क्षणांतच हा वाद हाणामारीत बदलला. यावेळी आरोपी हिमांशूने संतापाच्या भरात फावड्याने सुनीलच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुनीलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताची पत्नी सीमा सतनामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलमना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी हिमांशू उर्फ गुड्डू सोनटक्के याला अटक केली. आरोपीविरुद्ध खुनासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





