नागपूरच्या कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिल्लोर चौकाजवळील रेल्वे पटरीवर गालीगलौज करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चार अल्पवयीनांनी दोन भावांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून कलमना पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत यादव हा त्याचा भाऊ सागर यादव याला घरी बोलावण्यासाठी रेल्वे पटरीजवळ गेला होता. त्यावेळी हेमंत एका युवकाला शिवीगाळ करत होता. तेथून जाणाऱ्या काही अल्पवयीनांना ही शिवीगाळ आपल्याला उद्देशून असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी याबाबत आपल्या साथीदारांना माहिती दिली.
यानंतर चार अल्पवयीन घटनास्थळी पोहोचले आणि हेमंत व सागर यांच्याशी वाद घालू लागले. वाद वाढल्यानंतर त्यातील दोघांनी कोयते काढून दोन्ही भावांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हेमंतच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली, तर सागरच्या हातावर आणि खांद्यावर कोयत्याने वार करण्यात आले.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी दोन्ही भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रार मिळताच कलमना पोलिसांनी चार अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध सुरू असून पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. यातील एका अल्पवयीनाचा पूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.





