
नागपूर– शहरात गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या शातिर ठगाला नंदनवन पोलिसांनी अखेर जेरबंद केले. भेष बदलून पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी ज्येष्ठ महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करत होता. पोलिसांनी सापळा रचून भांडे प्लॉट चौक परिसरातून 52 वर्षीय अफताब उर्फ फहीम अहमद शेख, रा. छत्रपती संभाजीनगर, याला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने नागपूरसह विविध राज्यांमध्ये सुमारे 16 गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये नंदनवन, सक्करदरा, हुडकेश्वर आणि अजनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे 6 घटनांचा समावेश आहे. आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही पडताळणी सुरू आहे.
आरोपीच्या अनेक घटनांमधील चित्रफिती पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्याच्या आधारे ओळख पटवल्यानंतर शहर पोलिसांच्या विविध पथकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी वारंवार भेष आणि ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या.
सक्करदरा परिसरातील एका महिलेची सोन्याची दागिने फसवणूक करून लंपास केल्यानंतर परिमंडळ-4च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत एका महिलेच्या माध्यमातून आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळवली. त्यानंतर भांडे प्लॉट चौक परिसरात सापळा रचून त्याला पकडण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी यशोधरानगर परिसरातील डी-मार्टमधून खरेदी करून परतत असताना पोलिसांच्या हाती लागला. अटक होताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच्या फरारीला अखेर लगाम बसला.
आरोपीची गुन्हे करण्याची पद्धतही अत्यंत चलाख असल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हा केल्यानंतर तो आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करून काही अंतर पायी जायचा. त्यानंतर रिक्षाने सोनाराकडे जाऊन चोरीचे दागिने विकायचा. पैसे मिळताच तो त्याच दिवशी शहराबाहेर जाण्याच्या तयारीला लागायचा.
शहराबाहेर जाणाऱ्या वृत्तपत्र वितरणाच्या वाहनांकडून लिफ्ट घेऊन तो नांदेडपर्यंत प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नांदेडमध्ये जुगार खेळून पैसे खर्च केल्यानंतर पुन्हा अशाच वाहनांच्या मदतीने नागपूरला परत येऊन नव्या गुन्ह्याला सुरुवात करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी तो हॉटेल किंवा लॉजमध्ये मुक्काम करत नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरले होते.
चौकशीत आरोपीने नागपूरव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि तेलंगणा येथेही फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्याच्या कबुलीजबाबाची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संपर्कातील व्यक्तींचाही तपास केला जात आहे.




