नागपूर : कोराडी मंदिर परिसरात शनिवारी दुपारी एक गंभीर अपघात घडला. कोराडी ते मंदिर मार्गावरील गेट क्रमांक ४ जवळ सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक निर्माणाधीन गेटचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ११ मजूर जखमी झाले असून त्यापैकी नऊ जणांना नंदिनी हॉस्पिटल, कोराडी येथे, तर उर्वरित दोन जणांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्लॅबखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की, कोराडी मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या गेटच्या बांधकामातील काही भाग कोसळला आहे. “सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. घटनेचा सखोल तपास सुरू असून बचाव व मदत कार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
कोराडी मंदिर परिसरातील बांधकाम एनएमआरडीएअंतर्गत सुरू-
विशेष म्हणजे, कोराडी मंदिर परिसरात सुरू असलेले हे बांधकाम श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तर्फे नसून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) अंतर्गत सुरू आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.