नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नर्सिंग कॉलेजच्या पार्किंगमधून चोरी झालेल्या जुपिटर मोपेडचा वाहन चोरीविरोधी पथकाने छडा लावला आहे. पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १९ वर्षीय अनुराग धाबर्डे याला ताब्यात घेत चोरीची मोपेड जप्त केली.
वानाडोंगरी थांब्याजवळील शालिनी ताई मेघे नर्सिंग कॉलेजच्या पार्किंगमधून जुपिटर मोपेड चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात यश आले. त्यानंतर अनुराग धाबर्डे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीची मोपेड जप्त करण्यात आली.
आरोपी आणि जप्त करण्यात आलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





