Published On : Fri, Aug 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या जश्नात स्टंट केला तर…; वाहतूक पोलिसांची करडी नजर

Advertisement

नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर तिरंगा घेऊन दुचाकी वेगाने चालवणे, धोकादायक स्टंट करणे किंवा चारचाकी वाहनातून हुल्लडबाजी करणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर नागपूर वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत वाहनचालकांना कडक इशारा दिला आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी स्पष्ट केले की, स्वातंत्र्यदिन देशभक्ती आणि उत्साहात साजरा करा; मात्र वाहतुकीचे नियम मोडणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह रस्त्यावर इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणारा ठरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

दुचाकीवर स्टंट केल्यास कारवाई निश्चित-
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने तरुण दुचाकी घेऊन रस्त्यावर उतरतात. यावेळी भरधाव वाहन चालवणे, दुचाकी धोकादायक पद्धतीने चालवणे, स्टंट करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटना घडतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

चारचाकी वाहनातून हुल्लडबाजीही खपवून घेतली जाणार नाही-
दुचाकीस्वारांबरोबरच चारचाकी वाहनातून वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. भरधाव वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, रस्त्यावर वाहन थांबवून जल्लोष करणे किंवा इतर वाहनचालकांसाठी अडथळा व धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement

उत्साह साजरा करा, पण जबाबदारीने-
पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिन हा संपूर्ण देशासाठी अभिमान आणि सन्मानाचा दिवस आहे. या दिवशी उत्साह असणे स्वाभाविक आहे; मात्र उत्साहाच्या नावाखाली रस्ते सुरक्षेशी खेळ करू नये. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून इतरांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी.स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष रस्त्यावर स्टंट करून नव्हे, तर जबाबदारी आणि शिस्तीने साजरा करा, असा स्पष्ट संदेश वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.