NIT
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासातील पदोन्नती आणि पदस्थापनेचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. पदोन्नती मिळाल्यानंतरही संबंधित पदांवर नियुक्ती न मिळणे, पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित राहणे आणि अतिरिक्त कार्यभार वाटपातील कथित अनियमितता यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सभापती संजय मीना यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय निर्णयांबाबतही आक्षेप नोंदविण्यात येत आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप नव्या पदावर रुजू होण्याची संधी मिळालेली नसल्याचा आरोप आहे. हे कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरच कार्यरत आहेत. मार्च २०२६ मध्ये कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचीही पदस्थापना रखडली असून, त्यांना सहाय्यक अभियंता श्रेणी-१ या पदावरच काम करावे लागत असल्याचे सांगण्यात येते.
सहाय्यक अभियंता श्रेणी-१ पदावरील पदोन्नतीसाठी मार्च २०२६ मध्ये विभागीय पदोन्नती समितीची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीचे इतिवृत्त अद्याप मंजूर झाले नसल्याने संबंधित पदोन्नती आदेश जारी होऊ शकले नसल्याची तक्रार आहे. इतर प्रशासकीय संवर्गांतील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचीही पदस्थापना प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ज्येष्ठता सूचीतील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना संधी न देता कनिष्ठांकडे उच्च पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संधींवर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रलंबित पदस्थापना तातडीने करणे, विभागीय पदोन्नती समितीच्या इतिवृत्ताला मंजुरी देऊन पात्र कर्मचाऱ्यांचे आदेश जारी करणे आणि अतिरिक्त कार्यभार देताना ज्येष्ठता व नियमांचे पालन करणे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणांतील विलंबाची कारणे स्पष्ट करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
या आरोपांवर नागपूर सुधार प्रन्यास प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध नसल्याने पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.



