नागपूर : गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या पश्चिम बंगालमधील कापड व्यापाऱ्याच्या खोलीतून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर चोरीचा संशय व्यक्त केला असून, गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
व्यवसायासाठी हावड्याहून नागपुरात आला होता व्यापारी-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हावडा, पश्चिम बंगाल येथील योगेश शर्मा हे कापड विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. व्यावसायिक कामानिमित्त ते नागपुरात आले होते. गणेशपेठ येथील ‘द एशियन इन’ हॉटेलमधील खोली क्रमांक १०७ मध्ये ते मुक्कामी होते. त्यांच्यासोबत राजस्थान येथील राकेश जेठाराम शर्मा हा कर्मचारीही होता.
शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले.
अंघोळीला जाण्यापूर्वी टेबलवर ठेवले होते दागिने-
योगेश यांनी अंघोळीला जाण्यापूर्वी आपल्याकडील सोन्याचे दागिने खोलीतील टेबलवर ठेवले होते. यामध्ये सुमारे ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, ज्यांची किंमत अंदाजे ३ लाख रुपये, तसेच सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बाली, किंमत सुमारे ५० हजार रुपये, असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज होता.
योगेश हे अंघोळीसाठी गेले असताना त्यांच्या कर्मचाऱ्याने संधी साधून टेबलवरील दागिने घेतल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे.
अंघोळ करून परतल्यानंतर दागिने गायब-
अंघोळ करून खोलीत परतल्यानंतर योगेश यांना टेबलवर ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी खोलीत सर्वत्र शोध घेतला, मात्र दागिने मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांचा संशय सोबत असलेल्या कर्मचाऱ्यावर गेला. हॉटेल व्यवस्थापनाला माहिती दिल्यानंतर त्यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून राकेश जेठाराम शर्मा याचा शोध सुरू केला आहे.
हॉटेलमधील चित्रणाचीही पोलिसांकडून तपासणी-
या घटनेनंतर हॉटेलच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संशयित हॉटेलमधून कसा बाहेर पडला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच हॉटेलमधील चित्रण यंत्रणेत कैद झालेल्या दृश्यांची तपासणी करून त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याचाही शोध घेतला जात आहे.
संशयित आरोपी ताब्यात आल्यानंतरच चोरीची नेमकी घटना आणि दागिन्यांचा ठावठिकाणा स्पष्ट होणार आहे.




