
नागपूर : शहरातील बारमध्ये बेकायदा हुक्का संस्कृती पुन्हा एकदा समोर आली आहे. रामनगर मेन रोडवरील रिदम अँड वाइन बार अँड रेस्टॉरंट (तमाशा) येथे ग्राहकांना कथितरित्या फ्लेवरयुक्त हुक्क्यांची सेवा दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत कारवाई केली. या प्रकरणी बारचा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ जुलै रोजी रात्री १.२० ते २ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी बारमधून ४ हुक्का पॉट, ४ पाइप, ४ फ्लेवरयुक्त कंटेनर आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा सुमारे ₹८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ग्राहकांना हुक्का पुरवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
या प्रकरणी हेमंत राजकुमार गुरबक्षाणी (३३) आणि बृजेश बृज प्रसाद पाल (३६) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, २००३ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शहरात हुक्का पार्लरविरोधात सातत्याने कारवाई होत असतानाही बारच्या आड अशा प्रकारचा व्यवसाय सुरूच असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित नियंत्रण यंत्रणांच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शहरातील अशा ठिकाणांवर व्यापक मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




