नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने परिसरात शोककळा पसरली. अवघ्या तीन वर्षांच्या श्रीअंश पंकज आष्टणकर या चिमुकल्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून बेलतरोडी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्रीअंश हा वडिलांसोबत आश्रय सोसायटीसमोरील दुकानात गेला होता. दुकानासमोर खेळत असताना तो अचानक सिमेंट रस्त्यावर आला. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चिमुकला गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनी तातडीने त्याला तायवाडे रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालक हर्षद वाहाने याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.





