
नागपूर : शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. धरमपेठ परिसरात आज पहाटे भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत ७२ वर्षीय ज्येष्ठ योग शिक्षिका मंगला रामदासपंत केवटे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवटे या नेहमीप्रमाणे सकाळी योगा क्लास घेण्यासाठी झेंडा चौकातील गजानन महाराज मंदिराकडे जात होत्या. सुगंध मंगल कार्यालयाजवळील चौकात मागून आलेल्या वेगवान इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक CG 07 DC 8616) कारने त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेमुळे त्या काही अंतरावर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा प्राण गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून त्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या वेगमर्यादा उल्लंघन आणि बेदरकार वाहनचालना यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.








