
नागपूर -गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराने भररस्त्यात युवकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचशील बौद्ध विहारासमोर धारदार शस्त्राने वार करून युवकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या युवकाचाही आरोपींनी पाठलाग करत पुन्हा हल्ला केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर परिसरातील पंचशील बौद्ध विहारासमोर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी सनी चंद्रिकापुरे हा त्याचा मित्र सचिन पिल्ले याच्यासोबत उभा असताना हिस्ट्रीशीटर आशीष विल्सन हा आपल्या काही साथीदारांसह तेथे आला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
वाद सुरू असतानाच आशीष विल्सन याने अचानक पाठीमागून धारदार शस्त्राने सनीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेला सनी रस्त्यावर कोसळला. मात्र, कसाबसा स्वतःचा जीव वाचवत तो तेथून पळू लागला. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा त्याच्यावर हल्ला केला.
यावेळी आशीष विल्सन याने सनीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या सनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी मुख्य आरोपी आशीष विल्सन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आशीष विल्सन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.




