Published On : Fri, May 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर बनले पाकिस्तानी नागरिकांचे आश्रयस्थान? शहरात २२-२५ हजार नागरिकांचे वास्तव्य!

RTI कार्यकर्ते एजाज खान यांचा आरोप

Oplus_16908288

नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, नागपूरमधून समोर आलेला एक गंभीर दावा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारा आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये तब्बल २२ ते २५ हजार पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास असल्याचा खळबळजनक आरोप RTI कार्यकर्ते एजाज खान यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना केला आहे.

सरकारी आकडेवारी एक बाजू, पण प्रत्यक्ष वास्तव धक्कादायक-
गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 5,023 पाकिस्तानी नागरिक विविध व्हिसांवर वास्तव्यास आहेत. यामध्ये नागपूर शहरात सर्वाधिक 2,458 नागरिकांची नोंद आहे. मात्र, एजाज खान यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ नोंदवलेली संख्या असून प्रत्यक्षात नागपूरमध्ये २२ ते २५ हजार पर्यंत पाकिस्तानी नागरिक स्थायिक झाले आहेत.

१९९५ ते २०१२ दरम्यान आलेले आणि थांबलेले-
एजाज खान यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, १९९५ ते २०१२ दरम्यान 9,705 पाकिस्तानी नागरिक नागपूरमध्ये आले होते, त्यामध्ये 2,546 नागरिकांनी व्हिसाचा कालावधी ओलांडूनही भारतातच वास्तव्य सुरू ठेवले. इतकेच नव्हे तर 533 जणांना भारतीय नागरिकत्वही देण्यात आले आहे. 2013 नंतर आणखी 2,013 नागरिक परत गेले नाहीत आणि नागपूरमध्येच राहू लागले, अशी माहिती उघड झाली आहे.

सरकारी नोंदीत त्रुटी –

विशेष म्हणजे, 1980 ते 1994 दरम्यान नागपूरमध्ये आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची कोणतीही नोंद नागपूर पोलिसांकडे उपलब्ध नाही, हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण ठरत आहे. या मुद्द्यावर एजाज खान यांनी परराष्ट्र मंत्रालय व गृह मंत्रालयाकडे अधिक तपशील मागवले आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अंतर्गत सुरक्षेचा धोका?
एजाज खान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “नागपूरसारख्या संवेदनशील शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक स्थायिक होणे, हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक ठरू शकते.” त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे या प्रकरणी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थायिकतेचे पुरावे: घरं, जमिनी, बँक खाती, ओळखपत्रे-
नागपूरमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांनी घरं बांधली, जमिनी खरेदी केल्या, इतकेच नव्हे तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खातीही उघडली असल्याची माहिती एजाज खान यांनी दिली. यावरून सरकारी यंत्रणांची कार्यक्षमता आणि पडताळणी प्रक्रिया यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे.

सामान्य नागरिकांमध्ये चिंता –
या घडामोडींमुळे नागपूरमधील सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, “शासनाने यावर तात्काळ ठोस पावले उचलावीत, सर्व परदेशी नागरिकांची नोंद काटेकोरपणे व्हावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवाव्यात,” अशी मागणी होत आहे. ही बाब केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही, तर देशाच्या सुरक्षेविषयी व्यापक प्रश्न उपस्थित करणारी आहे. एजाज खान यांनी उघड केलेला हा प्रकार केवळ आकडेवारी नाही, तर सुरक्षेची जळती मशाल आहे. जी वेळेवर विझवली नाही, तर मोठा धोका ओढवू शकतो.

Advertisement
Advertisement