नागपूर :फिडे महिला विश्वचषक जिंकून परतलेल्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचे नागपूर विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुद्धिबळाच्या या आंतरराष्ट्रीय विजेतेपदामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेषतः नागपूरचा अभिमान वाढवणाऱ्या दिव्याच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण होते.
स्वागताच्या वेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके यांनी दिव्याच्या डोक्यावर फुलांचा मुकुट ठेवून तिचा गौरव केला. चाहत्यांनी ‘दिव्या देशमुख अमर रहे’ च्या घोषणा दिल्या आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी उसळली.
यावेळी भावना व्यक्त करताना दिव्याने सांगितले, माझ्या नागपूरकरांचे हे प्रेम आणि हा मान माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हे प्रेम मला अजून मेहनत करून देशासाठी अधिकाधिक यश संपादन करण्याची प्रेरणा देत आहे.
दिव्या देशमुखने आपल्या उत्कृष्ट खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल केले असून तिच्या या विजयाचा गौरव साजरा करण्यासाठी नागपूरकरांनी जल्लोषात स्वागत सोहळा आयोजित केला होता.