नागपूर :दारू सेवनासंदर्भातील नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेलं बाबा सावजी रेस्टॉरंट (हिंगणा टी-पॉईंट) येत्या ३१ जुलै २०२५ पासून ५ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्री. एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिले आहेत.
ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १४२(२) अंतर्गत करण्यात आली आहे. संबंधित रेस्टॉरंटविरोधात यापूर्वीही कलम ६८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. (गु.क्र. २५५/२०२४, १३९३/२०२४, आणि ४१३/२०२४) मात्र, कारवाईनंतरही संबंधित रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा आणि साहित्य उपलब्ध करून दिलं जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विजय लक्ष्मण पौनिकर हे रेस्टॉरंटचे संचालक असून, गेल्या वर्षभरात तिनदा कारवाई होऊनही त्यांनी कोणताही सुधारात्मक बदल केला नाही, असं पोलीस अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यातील दोन प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असून एक प्रकरण तपासाधीन आहे.
स्थानिक सामाजिक संस्थांनी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू सेवनामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याचा इशारा दिला होता – विशेषतः सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर.
त्यामुळे संभाव्य कायदा-सुव्यवस्था बिघडण्याच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त, संयुक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान याअगोदर बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या हॉटेल बकासुर आणि अपना ढाबा एनएच ०१ या दोन रेस्टॉरंट्सवरही अशाच स्वरूपाच्या उल्लंघनांमुळे १५ दिवसांची बंदी घालण्यात आली होती.