
नागपूर : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका युवकाकडून तब्बल १२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. मनपा, मेट्रो तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ओळख असल्याचा दावा करत आरोपींनी युवकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोकरीच्या बदल्यात त्याच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांत पैसे घेतल्याचा आरोप आहे. पैसे घेतल्यानंतर त्याला बनावट नियुक्तीपत्रही देण्यात आले.
हा प्रकार शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. तक्रारदार निखिल मसरके याची २०२५ मध्ये गणेशोत्सवादरम्यान प्रतीक युवराज उराडे याच्याशी ओळख झाली होती. प्रतीकने आपल्या मित्रांची मनपा, मेट्रो आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये ओळख असल्याचे सांगून निखिलला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरी मिळणार असल्याच्या विश्वासातून निखिलने आरोपींना एकूण १२ लाख रुपये दिले. त्यानंतर विश्वास कायम ठेवण्यासाठी त्याला कथित बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र घेऊन निखिल मेट्रोमध्ये पोहोचल्यानंतर त्याची नियुक्तीच बनावट असल्याचे समोर आले.
फसवणूक लक्षात आल्यानंतर निखिलने आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र, आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर निखिलने शांतिनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशाल जाधव, स्वप्निल सहारे, रोशन वानखेडे, दिगंबर शिंदे, सचिन राठोड, अरविंद चौधरी आणि प्रतीक युवराज उराडे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बनावट नियुक्तीपत्र, पैशांचे व्यवहार तसेच शासकीय कार्यालयांमध्ये ओळख असल्याच्या दाव्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.



