
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटाळ पांजरी परिसरात पैशांच्या जुन्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. या घटनेत प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित कार्तिक धार्मिक हा गोळी लागल्याने जखमी झाला. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मानेवाडा चौकात पैशांच्या व्यवहारावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मात्र, काही वेळाने वाद पुन्हा उफाळून आला. कार्तिक धार्मिक हा आपल्या साथीदारांसह घोटाळ पांजरी परिसरात पोहोचला आणि त्याने सुनील बनाईत याला घरातून खाली बोलावले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये पैशांच्या व्यवहारावरून पुन्हा वाद झाला.
दरम्यान, सुनील बनाईत याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर आनंद ठाकूर याच्यासह काही जण डस्टर वाहनातून तेथे पोहोचले. वाद वाढल्यानंतर आनंद ठाकूर याने रिव्हॉल्व्हर काढून कार्तिक धार्मिक याच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी लागल्याने कार्तिक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोळीबाराची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वाहनांची तपासणी करत आरोपींचा पाठलाग केला. सुरुवातीला तीन आरोपींना बुटीबोरीजवळ ताब्यात घेण्यात आले. तर काही आरोपी डस्टर वाहनातून पसार झाले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवत रामेश्वरी परिसरात कारवाई करून उर्वरित आरोपींनाही अटक केली.
या प्रकरणात सुनील बनाईत, आनंद सुरेश ठाकूर, पूर्ण चंद्रमणी नगराळे, शुभम संजय दिवेकर, निलेश टेंभुर्णे आणि सोनू ठाकूर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गोळीबारात वापरलेले रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
गोळीबारामागील नेमके कारण, रिव्हॉल्व्हर आरोपींच्या ताब्यात कसे आले आणि घटनेत प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत. जखमी कार्तिक धार्मिक याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी केली जात आहे.




