Nagpur: इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात काही पाने गुजराती लागल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर निविदेच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
श्री. तावडे यांनी निवेदनात सांगितले, सदोष बांधणी असलेली पुस्तके ज्यांना मिळाली असतील त्यांना ती पुस्तके तातडीने बदलून देण्याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारे, मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते यांना सूचना दिल्या आहेत. सदोष पुस्तके बदलून देण्याची कार्यवाही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तत्काळ करण्यात येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू व सिंधी या आठ भाषामध्ये दरवर्षी सुमारे 21 कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा केला जातो.
यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय स्तरावर जाहीर निविदा मागविण्यात येतात. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या निविदाधारकास पाठ्यपुस्तकांच्या छपाईची कामे सोपविली जातात. शैक्षणिक वर्ष सन 2018-19 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 114 मुद्रकांनी एकूण छपाईच्या 92 टक्के आणि परराज्यातील 28 मुद्रकांनी 8 टक्के छपाईची कामे केली आहेत.
शैक्षणिक वर्ष सन 2018-19 करिता इयत्ता 6 वीच्या भूगोल पुस्तकाच्या एकूण 11 लाख 50 हजार प्रतींची छपाई करण्यात येऊन ती संपूर्ण राज्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरवठा करण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या छपाईचे काम एकूण 11 मुद्रणालयांकडे सोपविण्यात आले होते. मेसर्स श्लोक प्रिंट सिटी अहमदाबाद, या मुद्रकाकडे भूगोल पुस्तकांच्या एकूण प्रतीपैकी एक लाख प्रतींची छपाई व बांधणीचे काम सोपविण्यात आले होते. मुद्रकाच्या भगिनी संस्थेकडे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी छपाई करावयाच्या गुजराती माध्यमांच्या कमी प्रती संख्या असलेली पुस्तके छपाई व बांधणीसाठी सोपविण्यात आली होती.
मुद्रकांकडून या पुस्तकाची बांधणी करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती पुस्तकाची पृष्ठे लागली असल्याची शक्यता आहे. संबंधित संस्थेकडून खुलासा मागविण्यात आला असून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.