नागपूर : रविवारी मध्यरात्री खामला येथील व्यंकटेश नगर परिसरात दोन गटांमध्ये भीषण गँगवार उसळला. जुने वैर डोकं वर काढल्याने झालेल्या या हाणामारीनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. राणा प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, खामला येथील रहिवासी मनीष ऊर्फ गोलू तोतवानी याचा व्यंकटेश नगरातील एका प्रतिस्पर्ध्यासोबत वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी या प्रतिस्पर्ध्यानं तोतवानीला शिवीगाळ करून धमक्या दिल्या होत्या. त्याचा राग धरून रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गोलू तोतवानी आणि त्याचे साथीदार कारने व्यंकटेश नगरात दाखल झाले. काही वेळातच प्रतिस्पर्धी गटही तिथे पोहोचला.
यानंतर तोतवानीच्या गटाने तलवारी व काठ्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला चढवला. एवढंच नव्हे तर त्यांनी घरांवर दगडफेक केली आणि एका महिलेला छेडछाड केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटाने तोतवानीच्या वाहनांची तोडफोड करून त्यालाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (झोन १) एस. रुशिकेश रेड्डी आणि राणा प्रतापनगर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत गोंधळ आटोक्यात आणला. पोलिसांनी गोलू तोतवानी आणि त्याच्या साथीदारांविरोधात मारहाण, महिलेला छेडछाड व शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हे नोंदवले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनाही धमक्या-
गोलू तोतवानी हा एका राष्ट्रीय राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. त्यानं “आपल्या संपर्कांचा” हवाला देत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही गंभीर परिणामांची धमकी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय संरक्षणामुळे त्याचे मनोबल वाढल्याचं दिसत आहे.
वारंवार गुन्हे, तरीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही-
तोतवानीवर यापूर्वीही जुगार अड्डा चालविणे, अवैध सावकारी, तसेच रात्री उशिरापर्यंत दारू विक्री असे अनेक गुन्हे नोंद असूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्याच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.