नागपूर : अंजनी परिसरातील गजानन उद्यानात गांजाचे रोपटे आढळल्याचा गंभीर दावा भाजप नेते आणि माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी केला आहे. सार्वजनिक उद्यानातच गांजाचे रोपटे उगवल्याच्या या आरोपामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुन्ना यादव यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना सांगितले की, गजानन उद्यानात गांजाचे रोपटे प्रत्यक्ष आढळून आले. त्यांच्या मते, परिसरातील गांजाचे व्यसन करणाऱ्या काही तरुणांनी जाणूनबुजून हे रोपटे लावले असावे. या संदर्भात धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, संबंधित तरुणांचा अद्याप शोध लागलेला नसल्याचा दावा त्यांनी केला.
यादव यांनी महापालिकेवरही निष्काळजीपणाचा आरोप केला. सार्वजनिक उद्यानांमध्ये नियमित देखरेख होत नसल्याने अशा बेकायदेशीर प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचे ते म्हणाले. मुलांच्या खेळासाठी आणि नागरिकांच्या फेरफटक्यासाठी असलेल्या उद्यानात अशा प्रकारचे रोपटे आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच गजानन उद्यान परिसरात पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाली होत असल्याचाही आरोप यादव यांनी केला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही युवक-युवती उद्यानात येत असल्याचे तसेच रात्रीही काही गैरप्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकारांकडे पोलिस आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून गांजाचे रोपटे नेमके कोणी लावले, ते उद्यानात कसे पोहोचले आणि इतके दिवस प्रशासनाच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटला, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मुन्ना यादव यांनी केली आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून सार्वजनिक उद्यानांमध्ये सुरक्षा आणि देखरेख अधिक कडक करण्याचीही त्यांनी मागणी केली.





