नागपूर : मंगळवारी उपराजधानी नागपूरवर पावसाने अक्षरशः धडक दिली. दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत थांबला नाही. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. या अवकाळी सरींनी पुन्हा एकदा नागपूर मनपाच्या विकास दाव्यांची हवा काढली.
शहरातील अनेक वसाहती, चौक आणि मुख्य मार्गांवर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले. काही भागांत गाड्या थेट पाण्यात अडकल्या. तर रस्त्यांवर गाड्या अक्षरशः गोगलगायच्या वेगाने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धरणांचा जलस्तर वाढला; गेट्स उघडले-
या मुसळधार पावसाचा परिणाम जिल्ह्यातील धरणांवरही दिसून आला. तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरणाचा जलस्तर झपाट्याने वाढल्याने प्रशासनाला दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले.
पेंच चौरई धरणातून सतत येणाऱ्या पाण्यामुळे तोतलाडोह धरण धोक्याच्या पातळीवर पोहोचले. सुरुवातीला दोन गेट उघडून ६३.३६८ क्यूमेक्स पाणी सोडण्यात आले. मात्र नंतर वाढत्या पाण्यामुळे रात्री सर्व १४ गेट उघडावे लागले आणि ४४३.५८ क्यूमेक्स पाणी पेंच नदीत विसर्ग करण्यात आले.नवेगाव खैरी धरणाचेही ८ गेट रात्री उघडण्यात आले आणि तब्बल २५३.४७२ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडले गेले.