नागपूर (पाचपावली) – शहरात आज 9 एप्रिलला दुपारच्या सुमारास एक मोठा अपघात घडला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मेहंदीबाग परिसरातील प्रसिद्ध ‘बाबू भाई फटाका सेंटर’ या दुकानाला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की काहीच मिनिटांत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुरुवातीच्या अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच या दुकानात दोन ट्रक भरून नवे फटाके आले होते, त्यामुळे आग अधिक भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पाचहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र, तासन्तास प्रयत्न करूनही आग पूर्णपणे आटोक्यात आणणे कठीण जात होते, कारण सतत फटाक्यांच्या स्फोटांमुळे बचाव कार्यात अडथळा येत होता.या आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आर्थिक नुकसान प्रचंड मोठं झाले आहे.सध्या पोलीस व अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी तैनात असून, पाचपावली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.