नागपूर -सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ परिसरात ७१ वर्षीय महिलेची बॅग हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. सागर नरेंद्र तिवारी (वय २१, रा. प्रभुनगर, जयताळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
खरे टाउन येथील मीनाश्री चंद्रमोवली अय्यर या रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास धरमपेठ येथील अन्नपूर्णा किराणा स्टोअर्सजवळून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून मागून आलेल्या सागर तिवारीने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. बॅगेत रोख रक्कम, भ्रमणध्वनी, ओळखपत्र आणि एटीएम कार्ड होते.
घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून भ्रमणध्वनी तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





