Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील आर्किटेक्ट निमगडे हत्या प्रकरण; सखोल तपासाच्या मागणीवर सत्र न्यायालयाची सीबीआयला नोटीस

Advertisement

नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात पुन्हा एकदा महत्त्वाचे न्यायालयीन वळण आले आहे. या प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि वैज्ञानिक पद्धतीने नव्याने तपास व्हावा, या मागणीसाठी मृत एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत नागपूर सत्र न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तसेच आरोपी रणजित हलके सफेलकर आणि मोहसिन बदरुद्दीन अन्सारी उर्फ राजा पॉप यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने सर्व संबंधितांना २२ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकेत अनुपम निमगडे यांनी दावा केला आहे की, या बहुचर्चित हत्या प्रकरणातील आतापर्यंतचा तपास अपुरा, त्रुटीपूर्ण आणि अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करणारा आहे. तपास केवळ दोन आरोपींपुरता मर्यादित ठेवण्यात आला असून, हत्येमागील व्यापक कट आणि इतर संभाव्य सूत्रधारांचा शोध घेण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोठ्या कटाचा तपास करण्याची मागणी-
याचिकेत हत्येमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे नव्याने व्यापक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांचा मागोवा (मनी ट्रेल), डिजिटल संवाद, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)चे विश्लेषण, शस्त्र खरेदीचा स्रोत, आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि इतर संशयित दुव्यांची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.

सीबीआयचा क्लोजर अहवाल यापूर्वी फेटाळला-
या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने पुरेशा पुराव्यांचा अभाव असल्याचे सांगत प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर अहवाल सादर केला होता. मात्र, अनुपम निमगडे यांनी त्याला विरोध दर्शविल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे खटला चालविण्यास पुरेसे असल्याचे नमूद करत सीबीआयचा क्लोजर अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आता नव्या तपासासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

२२ जुलैला पुढील सुनावणी-
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने सीबीआय आणि दोन्ही आरोपींना नोटीस बजावत २२ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात पुढील तपासाची आवश्यकता आहे की नाही, याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.

२०१६ मध्ये भरदिवसा झाली होती हत्या-
६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नागपुरातील सेंट्रल ॲव्हेन्यूवरील लाल इमली चौकात मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना प्रसिद्ध आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या हत्येने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.