नागपूर : ठाकरे सेनेने ‘सीजेपी’ आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधकांवर टीका केली. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला, तरी समाजात व्यवस्थेविरोधात जाणूनबुजून असंतोष आणि संताप निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत, असे त्यांनी म्हटले.
जयस्वाल म्हणाले, राज्यातील विविध प्रश्नांवर सरकार सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय करत आहे. मात्र, विरोधी पक्ष सध्या हतबल झाल्यामुळे डाव्या पक्षांसह काही संघटना एकत्र येऊन जनसामान्यांमध्ये व्यवस्थेविरोधात आक्रोश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात तणावाचे वातावरण निर्माण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाई आणि रखडलेल्या पेरणीबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले, गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संभाव्य परिस्थितीनुसार पाणी नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके यांच्या नव्या पक्ष स्थापनेच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना जयस्वाल यांनी, “केवळ एका व्यक्तीमागे लोक उभे राहत नाहीत. त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना शुभेच्छा,” असे सांगितले.





