नागपूर : केवळ १५० रुपयांच्या अतिरिक्त भाड्याच्या लालसेपोटी एका ई-रिक्षाचालकाने प्रवाशावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत तपास पूर्ण करून १९ वर्षीय आरोपीला अटक केली असून हल्ल्यात वापरलेला चाकू आणि ई-रिक्षा जप्त केली आहे.
माहितीनुसार, दिलीप धामणकर हे सोमानी रुग्णालयातून झाडे चौकाकडे जाण्यासाठी ई-रिक्षाने प्रवास करत होते. दरम्यान, मसूरकर चौकाजवळ चालकाला स्वामीनारायण मंदिराकडे जाणारा दुसरा प्रवासी मिळाला. त्याच्याकडून १५० रुपये भाडे मिळणार असल्याने चालकाने आधीपासून बसलेल्या दिलीप धामणकर यांना मध्येच उतरून जाण्यास सांगितले.
याला धामणकर यांनी विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या चालकाने शिवीगाळ करत धारदार चाकू काढला आणि धामणकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लकडगंज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळापासून सुमारे १५ किलोमीटर परिसरातील तब्बल ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गौरव बोधले (वय १९) याला पाचपावली परिसरातून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून हल्ल्यात वापरलेला धारदार चाकू तसेच ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.





