नागपूर : हिंगणा रोडवर एका मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात घातलेल्या धिंगाण्यामुळे काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. तरुणाने वारंवार बस आणि इतर वाहनांसमोर येत वाहतूक रोखली. एवढेच नव्हे तर तो थेट बससमोर रस्त्यावर आडवा झोपल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसचालकाने बराच वेळ संयम राखत तरुणाला बाजूला होण्याची विनंती केली. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर बसला पुढे जाऊ न देता सातत्याने अडथळा निर्माण केल्याने संतापलेल्या चालकाने त्याला एक थप्पड लगावली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भररस्त्यात मद्यधुंद अवस्थेत असा धिंगाणा घालणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढत असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागपूरमध्ये अशा घटना वाढत असताना पोलिसांकडून मद्यधुंद वाहनचालक आणि रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.





