
नागपूर – योगाच्या कालातीत तत्त्वज्ञानाला आधुनिक मेंदूविज्ञानाची जोड देणारे ‘योगा अॅण्ड माइंड मॅनेजमेंट’ हे पुस्तक नागपुरात प्रकाशित झाले आहे. डॉ. भूषण कुमार उपाध्याय, आयपीएस (से.नि.) यांचे हे पाचवे पुस्तक असून, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
या पुस्तकात योगसाधना आणि आधुनिक न्यूरोसायन्स यांच्यातील वैज्ञानिक नातेसंबंध उलगडून दाखवण्यात आला आहे. श्वसन, जागरूकता, आसन, ध्यान आणि अंतःशिस्त या योगसाधना मेंदूतील न्यूरल सर्किट्सवर कसा परिणाम करतात, ताणतणाव कमी कसा होतो आणि भावनिक सुदृढता कशी निर्माण होते, याचे शास्त्रीय विश्लेषण पुस्तकात करण्यात आले आहे.
पुस्तकातील प्रत्येक अध्याय योगतत्त्वांना दैनंदिन जीवनात वापरता येतील अशा व्यावहारिक पद्धतींमध्ये रूपांतरित करतो. एकाग्रता वाढवणे, सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवणे तसेच मानसिक संतुलन अधिक दृढ करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
परंपरेतील योगज्ञान आणि आधुनिक मेंदूविज्ञान यांचा समन्वय साधत, ‘योगा अॅण्ड माइंड मॅनेजमेंट’ हे पुस्तक शांत, सक्षम आणि सजग जीवनशैलीकडे मार्गदर्शन करते, असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत.
हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध असून, इच्छुकांनी booksales@kksu.org या ई-मेलवर संपर्क साधून पुस्तकाची मागणी नोंदवू शकतात.









