
नागपूर – नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या पट्टेवाटप मोहिमेला आज गती मिळाली. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला मालकीहक्काचा प्रश्न मार्गी लागत असल्याने अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रतापनगर येथील शांतिनिकेतन कॉलनी मैदानावर पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले. यावेळी हजारो लाभार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूरमधील झोपडपट्टीवासीयांना कायदेशीर मालकी मिळावी, यासाठी आमदार असतानाच शासननिर्णय काढण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली. महसूल विभाग, महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाली. हा यशस्वी मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फाळणीच्या काळात देशोधडीला लागलेल्या सिंधी समाजाने नागपूरसह विविध शहरांत रेफ्युजी कॉलनीत आश्रय घेतला होता. दशकानुदशके निर्वासित म्हणून जगलेल्या या बांधवांना आज त्यांच्या राहत्या जागेची अधिकृत मालकी मिळाल्याने कार्यक्रमात भावनिक क्षण पाहायला मिळाले. ‘फ्री होल्ड’ दर्जा मिळाल्याने हा केवळ जागेचा पट्टा नसून सन्मानाचा दस्तऐवज असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
शहरातील झुडपी जंगलाच्या नावाखाली अडकलेल्या जागांचा प्रश्नही अनेक वर्षे प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयातील दीर्घ लढ्यानंतर हा अडथळा दूर झाल्यामुळे आता रहिवाशांच्या नावावर मालकी नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांना पक्की घरे मिळावीत यासाठी ‘सर्वांसाठी घरे’ आणि पंतप्रधान आवास योजनेतून पुढील टप्प्यात व्यापक अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, “मालकीहक्काचा प्रश्न अत्यंत संवेदनशील होता. तो कुशलतेने सोडवून हजारो कुटुंबांना दिलासा देण्यात आला आहे,” असे सांगितले. नागपूर हे स्मार्ट शहर म्हणून विकसित होत असून, क्रीडांगणे, बाजारपेठा, उद्याने, भाजी मंडई, सक्षम वाहतूक, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधी कॉलनी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सिंधी समाजाने संत झुलेलालांचा जयघोष करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत केले. “निर्वासिताची ओळख पुसली गेली, आता आम्ही सन्मानाने आमच्या हक्काच्या घरात राहणार,” अशी भावना समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केली.
यावेळी ‘एनएमसी स्मार्ट मित्र’ या एआय आधारित डिजिटल हेल्पडेस्कचे उद्घाटनही करण्यात आले. शहर विकास मंचाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एकूण एक हजार मालकीपट्ट्यांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.









