
नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नवनियुक्त महिला प्राचार्यांना त्यांच्या कार्यालयीन कक्षात प्रवेश नाकारल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप लावून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी सुरक्षा रक्षक सुपरवायझर सिद्धार्थ म्हेसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी अशोक मेहरे यांनी याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या १९८९ पासून महाविद्यालयात कार्यरत असून नुकतीच त्यांची पाच वर्षांसाठी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या जीव रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
तक्रारीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी त्यांनी अधिकृतपणे प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्या नियमितपणे प्राचार्यांच्या कक्षातून प्रशासकीय कामकाज पाहत होत्या. मात्र, १० जुलै रोजी सकाळी महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्या कार्यालयीन कक्षाला कुलूप लावलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी सुरक्षा रक्षक सुपरवायझर सिद्धार्थ म्हेसकर याच्याकडे विचारणा केली असता, वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कक्ष उघडता येणार नसल्याचे सांगत नियुक्तीचे आदेश दाखविण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. डॉ. मेहरे यांनी आपण अधिकृत प्राचार्य असल्याचे स्पष्ट करूनही त्यांना कक्षात प्रवेश देण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना महाविद्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर घडल्याने संस्थेच्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप कोणी लावले, त्यामागे कोणाचा आदेश होता आणि सुरक्षा रक्षकाला नियुक्ती आदेश तपासण्याचा अधिकार कोणी दिला, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. मेहरे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२६, १२६(१) आणि १२६(२) अंतर्गत सिद्धार्थ म्हेसकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीचा मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासावा, या प्रकारात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींनाही आरोपी करण्यात यावे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अधिक कठोर कलमे लावावीत, अशी मागणी फिर्यादी डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांनी केली आहे.




