
नागपूर : चोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणांत पोलिसांना चकमा देत गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला धंतोली पोलिसांनी अखेर अटक केली. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सूरज बाबूराव वाढई याला ताब्यात घेतले.
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौक येथील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमध्ये आरोपी काही काळ व्यवस्थापक म्हणून काम करत होता. याचदरम्यान त्याने काउंटरमधून सुमारे ५२ हजार रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.
मात्र, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आरोपी वारंवार आपले ठिकाण आणि वास्तव्य बदलत होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्याव्यतिरिक्त नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात तसेच चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. या तिन्ही प्रकरणांत तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. आरोपी पैशांसाठी चोरी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.




