Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर सायबर पोलिसांचा मोठा दणका; ‘मस्त मनी’ लोन अॅपच्या आंतरराज्यीय ब्लॅकमेल रॅकेटचा पर्दाफाश!

मध्य प्रदेशातून आरोपी अटकेत
Advertisement

नागपूर : बनावट कर्ज अॅपच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक, मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीतील एका आरोपीला नागपूर सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील बेरसिया येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि लॅपटॉप असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, फिर्यादीने गुगल प्ले स्टोअरवरून ‘मस्त मनी’ हे इन्स्टंट लोन अॅप डाउनलोड केले होते. हे अॅप आरबीआयची मान्यता असल्याचे भासवत नागरिकांचा विश्वास संपादन करत होते. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो अपलोड करून घेत अल्प रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आले. पुढे फिर्यादीचे फोटो मॉर्फ करून ते नातेवाईकांना पाठवण्याची व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पैशांची उकळपट्टी केली.

तपासादरम्यान पोलिसांनी अॅपचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यानुसार मध्य प्रदेशातील बेरसिया येथील कामिल सिद्दिकी (वय 31) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून OnePlus Nord 2 मोबाईल आणि Dell Latitude 5420 लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये रिमोट अॅक्सेससाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअरही आढळले.

तपासात आरोपीच्या टेलिग्राम ग्रुप, बँक खाती आणि यूपीआय व्यवहारांची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीतील इतर सदस्य आणि मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे न्यायवैज्ञानिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मस्त मनी’ हे अॅप देशभरात सुमारे 5.32 लाख नागरिकांनी डाउनलोड केले होते. त्यापैकी जवळपास 2.98 लाख वापरकर्त्यांनी संशय आल्याने अॅप हटवले असले, तरी अद्याप 2.34 लाख मोबाईलमध्ये हे अॅप सक्रिय असल्याचे आढळले होते. हे अॅप फसवणुकीसाठी वापरले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते Google Play Store वरून हटविण्यात आले.

प्रत्येक व्यक्तीकडून सरासरी 10 हजार रुपयांची फसवणूक होण्याची शक्यता गृहीत धरल्यास, हे अॅप हटवल्यामुळे सुमारे 234 कोटी रुपयांच्या संभाव्य आर्थिक फसवणुकीला आळा बसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ही कारवाई नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.