नागपूर : अंबाझरी पोलीस ठाणे अंतर्गत गोकुळपेठ परिसरातील ‘सोशा कॅफे’ संचालक अविनाश राजू भुसारी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राईम ब्रांचने विशेष मोहिम राबवत बंटी उर्फ शैलेश विनोद हिरणवारसह पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये बंटी हिरणवार, बाबू हिरणवार, आदर्श वालके, दीपू मेश्राम आणि शिबू यादव यांचा समावेश आहे.
१५ एप्रिलच्या रात्री अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्यांचा मारा करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासात उघड झाले की, फरार असलेल्या शेखू गँगसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंटी व बाबू हिरणवार यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला होता. विशेष म्हणजे, अविनाश भुसारी यांचा या वादाशी थेट संबंध नव्हता, केवळ ते शेखू गँगच्या अविराज उर्फ अवि भुसारी यांचे नातेवाईक असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत होते आणि एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नव्हते, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. सुरुवातीला पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह आकाश शेन्द्रे याला अटक केली होती. त्यानंतर बंटीचा घनिष्ठ मित्र ऋषभ वानखेडे आणि प्रेयसी सिमरन लोखंडे यांनाही आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
उपायुक्त राहुल माकनीकर यांनी सांगितले की, आरोपी भंडारा, कोलकाता, विशाखापट्टणम, तिरुपती बालाजी, बल्लारशाह, गोंदिया अशा विविध ठिकाणी फिरत होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांची हालचाल लक्षात घेतली व योग्य वेळी पथके पाठवून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
मुख्य आरोपी बंटी हिरणवार व त्याच्या सहकाऱ्यांना नवागाव बंधारा रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली, तर अन्य आरोपी गोंदिया बसस्थानकावरून पकडण्यात आले. ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, संयुक्त आयुक्त निसार तंबोली, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील आणि उपायुक्त (गुन्हे अन्वेषण) राहुल माकनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे नागपूर शहरात मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.