नागपूर : नागपुरातील गणेशपेठ परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. गांधीसागर तलाव परिसरात कंबरेला देशी बनावटीचे ‘सिक्सर’ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे लपवून फिरणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गांधीसागर तलाव परिसरात एक युवक अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे ‘सिक्सर’ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहम्मद सोहेल मोहम्मद साबीर (वय 26) अशी आहे. पोलिस चौकशीत आरोपीने हे शस्त्र त्याच्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्राकडून मिळाल्याची कबुली दिली. संबंधित मित्राचा मृत्यू झाल्यानंतर ते पिस्तूल त्याच्याकडेच राहिल्याचा दावा आरोपीने केला आहे.
मात्र आरोपीचा हा दावा कितपत खरा आहे, शस्त्र नेमके कुठून आणले गेले, त्याची पुरवठा साखळी कोणती आहे आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याचा पोलिस सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.





