नागपूर :शहरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्था ची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेत स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी माहिती दिली.
कुख्यात गुन्हेगार सुमित चिंतलवार (35 वर्ष पार्वतीनगर अजनी),पवन उर्फ मिहीर राजेंद्र मिश्रा (वय 39 वर्ष, रा. मानेवाडा),पलाश प्रमोद दिवेकर (वय 21 वर्ष, रा. रमाईनगर,अजनी) शेख अतिक फरीद शेख उर्फ भुरू (वय 25 बेसा), मनिष रंजित कुशवाह(वय 45 वर्ष, रा. हुडकेश्वर)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजय सिसोदिया (रा.राजस्थान) याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.
कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केल्या गेलेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 550 ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले. ज्याची एकूण किंमत 54 लाख 40 हजार आहे. याव्यक्तिरिक्त पोलिसांनी इतर मुद्देमालही जप्त केला ज्याची किंमत 66 लाख 21 हजार इतकी आहे.
माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.आरोपी 31 डिसेंबर करीता एम.डी. ड्रग्ज घेऊन राजस्थान येथून मध्यप्रदेश मार्गे नागपुरात दाखल झाले. पोलिसांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. याआधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान कोरडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे, अशी माहिती सिंगल यांनी दिली.