
नागपूर : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्याच्या निकालावर ऑनलाइन सट्टा लावून घेणाऱ्या दोघांवर नागपूर पोलिसांनी कारवाई केली. भांडेवाडी परिसरातील न्यू सूरज नगर, रिंग रोड येथील एका घरातून हा सट्टेबाजीचा व्यवहार सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाला बंटी शेरु अहमद पठाण हा घरातून क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एपीआय भगवान कोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यावेळी बंटी पठाण याच्यासोबत विक्की अनिल बनसोड हा देखील आढळून आला. दोघे मोबाईलच्या माध्यमातून सट्ट्याचे व्यवहार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईत तीन मोबाईल फोन, सॅमसंग कंपनीचा टॅब तसेच 17 हजार 500 रुपयांची रोकड असा सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सट्टेबाजीच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आर्थिक व्यवहार कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



