
नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्प आणि माधव नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चोरबाहुली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय, चोरबाहुली येथे झालेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 300 ते 350 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीदोष, मोतीबिंदू तसेच डोळ्यांशी संबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शिबिराच्या ठिकाणी पोहोचता यावे यासाठी गावागावांतून जीप्सी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला.
या उपक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य स्वानंद सोनी यांच्या कल्पनेतून साकारण्यात आली.
यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी चोरबाहुली जयेश तायडे, पवनी वनपरीक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, निलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक गणेश खंडाईत, दुर्गाप्रसाद खंडाते यांच्यासह वनरक्षक, गाईड, जीप्सी चालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वन विभाग आणि माधव नेत्रालयाच्या या सामाजिक उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच मोफत नेत्र तपासणी आणि पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध झाली.
अजय मेहरकुळे रामटेक प्रतिनिधी



